लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : पेठ-सांगली मार्गावर आष्टा शिंदे मळ्यानजीक चारचाकीस्वाराचा गाडीवरील ताबा सुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात प्रसाद प्रभाकर देशमुख (वय ३२, रा. कोडोली, सातारा) हा युवक ठार झाला. हा अपघात शनिवारी रात्री १० च्या दरम्यान झाला.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार प्रसाद देशमुख याचा हॉटेलचा व्यवसाय आहे. कामानिमित्त तो चार चाकी गाडी (क्र. एमएच ११ बीएच १६५४) वरून प्रवास करत होता. साताऱ्याहून सांगलीकडे आष्टा मार्गे जात होता. रात्री १० च्या दरम्यान आष्ट्याजवळ शिंदे मळ्यानजीक प्रसादचा गाडीवरील ताबा सुटला. गाडी झाडाला धडकून उलटली. गाडीच्या चालकाच्या मागील बाजूचे चाक निसटून बाजूला गेले. दार निखळले. या अपघातामध्ये प्रसाद देशमुख याला गंभीर मार लागल्याने दीपक डिसले व सहकाऱ्यांनी सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. आष्टा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित सिद्ध तपास करीत आहेत.