अंजली गुजर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्या मदतीसाठी बहीण अमृता मदतीसाठी जरंडी येथे काही दिवसांसाठी आल्या होत्या. मंगळवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जरंडी ते जरंडी पत्रा रस्त्यावर दाेघीही मॉर्निंग वॉकसाठी निघाल्या होत्या. रस्त्याच्या कडेने चालत जात असताना जरंडीहून जरंडी पत्र्याच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेल्या मोटारसायकलने दोन्ही बहिणींना जोरदार धडक दिली. अपघातात दाेघीही जखमी झाल्या. त्या जखमी झालेले पाहून घटनास्थळी न थांबताच मोटारसायकलस्वार जरंडी पत्र्याच्या दिशेने पसार झाला. या घटनेत अमृता फुटाणे यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्त आले, तर अंजली गुजर यांच्या बरगडीला मार लागला.
या घटनेनंतर नातेवाइकांनी दोघींना सावळज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यापूर्वीच अमृता फुटाणे यांचा मृत्यू झाला होता, तर गुजर यांना तासगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. याबाबत तासगाव पोलिसांनी अज्ञात मोटारसायकलस्वार विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस नाईक जाधव हे करीत आहेत.