कवठेमहांकाळ : दुचाकी घसरून रस्त्यावर आपटल्याने तालुक्यातील कोकळे येथील एक ठार, तर एक गंभीर जखमी झाला. हिमालय मगन ऐवळे (वय ३०), असे मृताचे, तर संतोष विठोबा शिंगाडे (४०), असे जखमीचे नाव आहे. हा अपघात बुधवारी दुपारी २ वाजेदरम्यान घडला.
या अपघाताची कवठेमहांकाळ पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोकळे येथील हिमालय ऐवळे व संतोष शिंगाडे कामानिमित्त कवठेमहांकाळ येथे आले होते. काम आटोपून ते कोकळे गावी निघाले होते. कवठेमहांकाळ-जत रस्त्यावर मासाळ मळ्याजवळ त्यांची दुचाकी घसरून पडली. त्यामुळे हे दोघेही जोरात डांबरी रस्त्यावर पडले. बघ्यांनी त्यांना उपचारासाठी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना हिमालयचा मृत्यू झाला, तर संतोष शिंगाडे यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार विजय घोलप करीत आहेत.