फोटो-०६मिरज१ ते ७
मिरज : मिरज-पंढरपूर रस्त्यावर केबल दुरुस्ती करताना मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडलेल्या कामगारास बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या साहाय्याने मातीचा ढिगारा बाजूला करण्यात येत होता. यावेळी जेसीबीचे बकेट डोक्यात घुसून अभिषेक सिद्धू सावंत (वय १८, रा. कुपवाड) हा कामगार जागीच ठार झाला.
मिरज-पंढरपूर रस्त्यावर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे महापालिकेच्या विस्तारित भागातील ड्रेनेजसाठी रस्त्याच्या खुदाईचे काम सुरू आहे. रस्त्याकडेला ड्रेनेजसाठी पंधरा फूट चर खोदण्यात आली आहे. खुदाई करताना एका खासगी मोबाईल कंपनीची केबल तुटली होती. ही केबल जोडण्यासाठी १५ फूट खड्डयात उतरून अभिषेक सिद्धू सावंत हा केबल जोडत होता. यावेळी त्याच्या अंगावर माती कोसळल्याने तो मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडला. जेसीबीच्या साहाय्याने ढिगारा बाजूला करून त्यास काढण्याचा प्रयत्न करत असताना जेसीबी चालकाला मातीच्या ढिगाऱ्याखाली अभिषेक दिसला नाही. जेसीबीचे बकेट डोक्यात घुसल्याने अभिषेक जागीच ठार झाला.
सुमारे दोन तास मातीचा ढिगारा उपसून अभिषेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. तरुणाचा मृत्यू झाल्याने शहर पोलिसांनी जेसीबी चालकासह दोन्ही ठेकेदारांच्या चार कर्मचाऱ्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
चाैकट
गुन्हा दाखल करण्याची मागणी
ड्रेनेज ठेकेदार व जियो कंपनीच्या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे काम करताना कोणतीही सुरक्षितता बाळगली नाही. कामाकडे महापालिकेचा एकही अधिकारी फिरकला नसल्याने या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेना कामगार नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांनी पोलिसांत केली.