सांगली : गुंतवणूक केलेल्या रकमेचा परतावा न देता सांगलीतील तरुणास पाच लाख ८१ हजार ८२१ रुपयांचा गंडा घालण्यात आला. याप्रकरणी विनायक बाळासाहेब शिंदे (वय २९, रा. मंगलमूर्ती कॉलनी, प्रेरणा अपार्टमेंट, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
त्यानुसार नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, यात सूरज अजित पवार (रा. निमसोड), सचिन पावसे (रा. वेणेगाव, जि. सातारा), अक्षय राजेंद्र शिंदे (रा. कराड), राजेंद्र तुकाराम कोरडे (रा. उस्मानाबाद), अमोल राजाराम जगताप (रा. पूर्व मुंबई), मनोजकुमार भिकू बिरनाळे (रा. वाई, जि. सातारा), सूरज तानाजी पाटील (रा. अकनूर, ता. राधानगरी), नानासाहेब मल्हारी जगताप (रा. सातारा) आणि सचिन शिवाजी कापसे (रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी विनायक शिंदे व संशयित सचिन कापसे दोघे मित्र असून, इतर संशयित कापसेच्या परिचयाचे आहेत. कापसेने शिंदे यांना कऱ्हाड येथील क्रिएटिव्ह एम्पायर या कंपनीत पैसे गुंतवल्यानंतर कंपनी एका महिन्यात २० टक्के परतावा देत असल्याचे सांगितले होते. परिचयातील मित्राकडून गुंतवणूकीची संधी आल्याने शिंदे यांनीही बॅंकेतून कर्ज काढून सात लाख रुपये कंपनीत गुंतवले.
गुंतवणुकीचा परतावा मिळत नसल्याने शिंदे यांनी चौकशी केली असता, संशयितांनी शिंदे यांना कंपनी बंद पडल्याचे सांगितले. मात्र, पैसे परत देण्याचे आश्वासन संशयितांनी दिले होते. वारंवार पाठपुरावा करूनही, पैसे परत न दिल्याने आपली फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.