कुरळप : येलूर फाटा (ता. वाळवा) येथील पुणे-बंगळुुरू महामार्गावर खासगी प्रवासी बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू, तर एक जण जखमी झाला. दीपक विजय शिंदे (वय २३, रा. तांदुळवाडी, ता. वाळवा), असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी १० वाजात घडली. याप्रकरणी बस चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, कुरळप पोलिसांत जखमी संतोष विजय शिंदे (रा. तांदुळवाडी) याने फिर्याद दिली आहे.
मृत दीपक व जखमी संतोष शिंदे हे दोघे सख्खे भाऊ होते. शुक्रवारी सकाळी दोघेही कामानिमित्त तांदुळवाडीहून इस्लामपूरला दुचाकीवरून (एमएच-१० ३७७८) निघाले होते. यावेळी येलूर फाटा येथे पाठीमागून आलेल्या भरधाव खासगी प्रवासी बसने (एमएन-०७ एच-०००४) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात दीपक व संतोष काही अंतरावर फरपटत गेले. यात दीपकच्या अंगावरून बसचे पाठीमागील चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला, तर संतोष हा बाजूला फेकला गेल्याने तो गंभीर जखमी झाला.
अपघाताचा आवाज आल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थाळी धाव घेतली. यावेळी बसचा चालक अशपाक मोहम्मद मुल्लाणी (रा. वासुंबे, ता. खानापूर) हा बस घटनास्थळी सोडून पळाला. महामार्गाकडेच्या एका उसाच्या शेतात तो लपल्याचे काही नागरिकांनी पाहिले. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्याला ताब्यात घेतले. अधिक तपास कुरळप पोलीस करत आहेत.