सांगली : शहरातील इंदिरानगरमध्ये एका तरुणावर कोयत्याने वार करून त्यास जखमी करण्यात आले. या प्रकरणी रोहित उर्फ प्रकाश बाबासाहेब सातपुते (वय ३०, रा. रमामातानगर, सांगली) याने ओंकार जाधव, हृषीकेश कांबळे (दोघेही रा. हनुमाननगर), बापू कांबळे, शुभम शिकलगार, राहुल पाटील, प्रेमानंद अलगडी (सर्व रा. गारपीर चौक, सांगली) यासह तीन अनोळखी जणांविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रोेहित सातपुते हा महापालिकेत कामगार आहे. बुधवार, ५ मे रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास संशयितांनी त्यास गाठून काठीने मारहाण केली. तर दोघांनी रोहितच्या डोक्यात कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.