सांगली : जन्मजात व्याधीग्रस्तांच्या शारीरिक समस्यांसाठी योग आणि संगीत अत्यंत सकारात्मक परिणाम साधू शकतात, हे सिद्ध झाले आहे, असे मत योगतज्ज्ञ व संगीतज्ज्ञ डॉ. भाग्यश्री मुळे यांनी व्यक्त केले.
येथील सुखायु जन्मजात व्याधी प्रतिबंध व साहाय्य प्रतिष्ठानच्या वतीने मानवराहत चॅरिटेबल ट्रस्टच्या आरोग्य तपासणी शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून मुळे बाेलत होत्या. या शिबिरात जन्मजात मूकबधिर असलेले इचलकरंजी येथील वस्त्रोद्योजक वरुण बरगाले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. जन्मजात व्याधीग्रस्त असूनही अँडोरेबल लाइफस्टाइल ही वस्रोद्योग संस्था ते चालवतात. त्यांच्या कारखान्यात त्यांनी २0 मूकबधिर मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबरच या कार्यक्रमात सौ. शारदा दाते व प्रकाश दाते या पालकांचाही विशेष गौरव करण्यात आला. त्यांचा डाऊन सिंड्रोम असलेला प्रथमेश या मुलाला त्यांनी जिद्दीने घडवले असून, आज तो यशस्वी ग्रंथपाल म्हणून कार्य करत आहे. त्याला राष्ट्रपती पुरस्कार व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलेले आहे. या शिबिरामध्ये विविध व्याधीग्रस्त रुग्ण व त्यांचे पालक यांची मोफत तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर त्यांना मोफत मेडिकल किटही देण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये डॉ. रवींद्र व्होरा, डॉ. सुबोध उदगावकर, डॉ. महेश साळे, डॉ. रमेश मगदूम, आहारतज्ज्ञ नेहा तारळेकर आणि स्पीच थेरपिस्ट स्मिता माणकापुरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी डॉ. नंदिनी निकम यांनी स्वागत केले, तर आभार सुखायुचे अध्यक्ष नरेंद्र दीक्षित यांनी मानले. या कार्यक्रमासाठी सुखायुचे श्रीकांत पुराणिक, कविता पाटील, ओमप्रसाद सातपुते यांनी परिश्रम घेतले.