गणेश पवार -- नेवरी --विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येरळा काठावरील गावांमध्ये गेल्या चार-पाच दिवसांपासून पालकमंत्री डॉ. पतंगराव कदम व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी विविध कामांच्या माध्यमातून मॅरेथॉन दौरा पार पाडला. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात दिग्गजांचा लोकांच्या प्रत्यक्ष भेटीवर भर आहे.कडेगाव तालुक्यात सर्वाधिक मतदान वांगीचे, तर त्याखालोखाल नेवरी गावचे आहे. कदम-देशमुखांनी मतदान जास्त असलेली गावे नजरेसमोर ठेवून वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून जनतेशी थेट संपर्क करण्याचे ठरवले आहे. पालकमंत्री डॉ. कदम यांनी तर या परिसरात विविध कामांचा धडाका उडवून दिला आहे, तर देशमुख यांनी शेताच्या बांधापर्यंत जाण्यावर भर दिला आहे. अद्याप देशमुख यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसला, तरी येत्या चार दिवसांत कार्यकर्त्यांची बैठक घेऊन ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पक्षप्रवेश जाहीर करतील, असे सांगितले जाते. देशमुख भाजपमध्येच प्रवेश करतील, असेही सांगितले जात असले तरी, महायुतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे आहे. त्यामुळेच त्याबद्दल संभ्रम वाढला आहे.देशमुख रिंगणात उतरणार असल्याने विधानसभेच्या मैदानात कदम-देशमुख या दोन मातब्बर नेत्यांची कुस्ती होणार असल्याचे चित्र दिसत आहे. डॉ. पतंगराव कदम यांनी शेतावरील रस्ते, अंतर्गत रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, नवीन कामे, दहीहंडी सोहळे, महिला मेळावे या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मोर्चेबांधणी केली आहे. त्यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, पुतणे शांतारामबापू कदम, जितेश कदम यांनी या निवडणुकीची धुरा हातात घेतली आहे. देशमुख गटाकडून पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांनी संपर्कावर भर दिला आहे.
येरळा काठावर कदम-देशमुखांचा मॅरेथॉन दौरा
By admin | Updated: August 27, 2014 23:14 IST