मिरज : यशवंतपूर-पंढरपूर नवीन एक्स्प्रेसचे आज (मंगळवारी) रेल्वे प्रवासी कृती समितीतर्फे मिरज स्थानकावर स्वागत करण्यात आले. एक्स्प्रेसचे चालक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करून पेढे वाटप करण्यात आले. यशवंतपूर-मिरज या द्विसाप्ताहिक एक्स्प्रेसचा पंढरपूरपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे मंगळवारी व शुक्रवारी सकाळी नऊ वाजता मिरज स्थानकातून पंढरपूरला जाण्यासाठी एक्स्प्रेस उपलब्ध झाली आहे. नवीन एक्स्प्रेसला मिरजेत प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. रेल्वे प्रवासी कृती समितीचे सुकुमार पाटील, गजेंद्र कुळ्ळोळी, मकरंद देशपांडे, संदीप शिंदे, प्रमोद इनामदार, ज्ञानेश्वर पोतदार, सुनील खाडिलकर, किशोर भोरावत, प्रकाश इनामदार यांच्यासह कार्यकर्त्यांनी रेल्वेचालक मसूद, स्थानक अधीक्षक एम. व्ही. रमेश व सहाय्यक कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. यावेळी मिरज रेल्वे स्थानकावर पेढे वाटप करून प्रवाशांना गुलाबपुष्प देण्यात आले. नवीन एक्स्प्रेस आरग, कवठेमहांकाळ, सांगोला या तीनच स्थानकांवर थांबणार आहे. पंढरपूरला जाणाऱ्या जलद एक्स्प्रेसमुळे वारकरी व प्रवाशांची चांगली सोय झाली आहे. (वार्ताहर)
यशवंतपूर-पंढरपूर एक्स्प्रेस सुरू
By admin | Updated: March 3, 2015 22:34 IST