सांगली : कुस्तीला गतवैभव मिळवून देत अनेक खेळाडूंची राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील वाट शरद पवारांमुळे सुकर झाली. ज्यांना या क्षेत्रातील काडीचीही माहिती नाही, त्या सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेचा आम्ही निषेध करतो, असे कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले, ज्यावेळी कुस्ती संपेल की काय, अशी भीती या क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत होती, त्यावेळी शरद पवारांनी या क्षेत्राला गतवैभव मिळवून दिले. शाहू महाराजांनंतर यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, मामासाहेब मोहोळ यांनी कुस्तीची परंपरा जोपासण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. १९५३ साली कुस्तीगीर परिषदेची स्थापना केली. जिल्हा तालीम संघ उभारले. तालुका पातळीपासून कुस्ती स्पर्धा सुरू केल्या. जिल्हा निवड चाचणी घेऊन राज्य पातळीपर्यंत कुस्तीगीर स्पर्धा सुरू झाली. त्यानंतरही काही काळानंतर ज्यावेळी या क्षेत्राला योग्य नेतृत्वाची गरज होती, तेव्हा सर्वच कुस्तीक्षेत्रातील मान्यवरांनी शरद पवारांना अध्यक्षपद स्वीकारण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर त्यांनी या क्षेत्राला वैभव मिळवून दिले.
आयपीएलच्या धर्तीवर खेळाडू दत्तक योजना सुरू केली. त्यातून अनेक मल्ल देश-विदेशात नामवंत झाले. पवारांचे योगदान हे ज्यांना माहीत नाही, त्यांनी याविषयी व्यर्थ बडबड करू नये. केवळ कुस्तीच नव्हे तर क्रिकेटसह अन्य बऱ्याच खेळांसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. दुसरीकडे टीका करणाऱ्यांनी नेमके कोणत्या क्षेत्रासाठी योगदान दिले, हे स्पष्ट करावे. केवळ प्रसिद्धीसाठी अशा टीका करण्यात ते धन्यता मानत आहेत. त्यामुळे आम्ही जिल्हा तालीम संघाच्या वतीने त्यांचा निषेध करीत आहोत. अशा प्रवृत्तींमुळे क्रीडाक्षेत्रासारख्या क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम करणाऱ्या नेतृत्वाचा मोठा अवमान होत असून, सामाजिक दृष्टीने अशा प्रवृत्ती घातक ठरू शकतात.