वाकुर्डे उपसा सिंचन योजना अंतिम टप्प्यात असताना कोरोनाची दुसरी लाट आली आणि पाण्याची प्रतीक्षा आणखी दोन महिन्यांनी वाढली. लाॅकडाऊनमुळे अधिकारी, कामगारांना कामावर येताना अडचणी वाढल्या. त्यातच कोरोना रुग्ण वाढल्याने रुग्णांना ऑक्सिजन मागणीचे प्रमाण वाढले. त्यामुळे वाकुर्डे उपसा सिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईन जोडणीसाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन मिळणे बंद झाले. त्याचा परिणाम म्हणून वाकुर्डे योजनेचे काम बंद पडले.
सध्या ऑक्सिजन मिळू लागल्याने वाकुर्डे योजनेचे काम सुरू करण्याबाबत बबन कचरे यांनी कार्यकारी अभियंता देवाप्पा शिंदे, सहायक अभियंता डी. डी. परळे यांनी मानकरवाडी-रेड-कार्वे, ढगेवाडी(आझादनगर), इटकरेच्या ठेकेदार व अधिकाऱ्यांशी गुरुवारी सविस्तर चर्चा केली असून, आठ-दहा दिवसांत पुन्हा काम सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती कचरे यांनी दिली.