मांगले : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांना जोडणाऱ्या वारणा नदीवरील मांगले -काखे पुलाचे काम नदीतील अतिरिक्त पाण्यामुळे रखडले असून, किमान दिवाळीपूर्वी हा पूल करा, अशा सूचना पन्हाळा -शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांच्या प्रयत्नातून सुमारे १२ कोटी रुपये या पुलासाठी मंजूर झाले होते. केवळ आठ महिन्यात पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे.
वारणा नदीतील पाण्याचा प्रवाह कमी न केल्याने गेल्या काही दिवसापासून काम रखडले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार कोरे यांनी मुख्य पुलाच्या कामास भेट देऊन पाहणी केली.
मांगले गावाकडील पुलाच्या पिलरचे काम थांबले होते. हे काम जूनच्या पहिल्या आठवड्यात व किमान पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आवश्यक आहे. पिलरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुलाचे अंतिम टप्प्यातील उर्वरित सर्व काम दिवाळीपूर्वी करून हा पूल वाहतुकीसाठी खुला करून देण्याच्या सूचना आमदार कोरे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.