सांगली : शहरातील शामरावनगर परिसरात दारू व गांजा ओढणाऱ्या व्यक्तींवर कारवाईच्या मागणीसाठी या परिसरातील महिलांनी आक्रमक पवित्रा घेत पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर केले. व्यसनी लोकांमुळे महिलांना अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने यावर कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
शामरावनगरमध्ये दारू पिणारे व गांजा ओढून नशेत असणाऱ्या तरुणांकडून महिलांना शेरेबाजी करणे, अपशब्द वापरण्याचे प्रकार घडत आहेत. सादर केलेल्या निवेदनात महिलांनी व्यसनी लोकांच्या थांबण्याची ठिकाणेही दिली आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे त्रास होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा तसेच या परिसरात कायमस्वरूपी पोलीस चौकी उभारावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
मनीषा शिंदे, सरला लिबाले, प्रियांका दळवी, लक्ष्मी चव्हाण, शांता कोळी, पूनम खामकर, जरीना जमादार, स्वाती दळवी, विजया देशपांडे यांच्यासह महिलांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.