लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेतील महिला व बालकल्याण समिती ही केवळ नावापुरतीच असून, त्याला आर्थिक मंजुरीचे अधिकार नाहीत. त्यामुळे प्रशासनच मालक झाले असून, या समितीला अधिकार देण्यासाठी प्रदेशाध्यक्ष या नात्याने पुढाकार घ्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या नगरसेविकांनी नाना पटोले यांच्याकडे केली.
याबाबतचे निवेदनही नगरसेविकांच्यावतीने देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातील महिला व बालकल्याण विकासासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीला महापालिकेच्या एकूण बजेटपैकी ५ टक्के निधीची तरतूदही करण्यात आली आहे. पण ही समिती केवळ नावापुरतीच आहे. समितीला आर्थिक मंजुरीचे अधिकारच नाहीत. त्यांच्या वाट्याचा निधी कधी खर्च होतो, हेही समजत नाही. महिला व बालकल्याणासाठी योजना राबविताना अनेक अडचणी येतात. त्यासाठी शासनस्तरावरून परिपत्रक प्रसिद्ध करण्याची गरज आहे. महिला व बालकल्याण मंत्र्यांसोबत बैठक घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष या नात्याने पुढाकार घ्यावा, असे साकडेही घातले आहे.
यावेळी आमदार मोहनराव कदम, जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, नगरसेविका रोहिणी पाटील, मदिना बारुदवाले, बबिता मेंढे, वर्षा निंबाळकर यांच्यासह काँग्रेस नगरसेविका उपस्थित होत्या.