इस्लामपूर : बोरगाव (ता. वाळवा) येथील ३२ वर्षीय महिलेने आजारास कंटाळून रविवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. स्नेहल विनोद म्हेत्रे (रा. सिद्धार्थनगर, बोरगाव) असे मृत महिलेचे नाव आहे.
रविवारी सायंकाळी ‘दवाखान्यात जातो’ असे पतीला सांगून त्या बाहेर पडल्या हाेत्या. पण दिवसभर त्या न परतल्याने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पती विनोद यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर स्नेहल यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर विनोद म्हेत्रे यांनी पोलिसात स्नेहल या बेपत्ता असल्याची वर्दी दिली. पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून ठावठिकाणा शोधला असता, तो बोरगावमधील नदीकाठच्या घराच्या परिसरात दाखवत होता. पोलिसांनी पती विनोदसह नदीकाठावरील जुन्या घरात जाऊन पाहणी केल्यावर, तेथे स्नेहल यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनास्थळी त्यांचा माेबाईल मिळाला. व्हॉट्स ॲपच्या स्टेटसवर स्नेहल यांनी ‘मी माझ्या आजाराला कंटाळून आत्महत्या करत आहे. कोणाला जबाबदार धरू नका आणि मेल्यावर माझा पीएम करू नका. आधीच खूप मानसिक चिरफाड झालीय माझी. फक्त माझ्या मुलांना सांभाळा’, असे लिहून ठेवले होते.
विनोद म्हेत्रे यांनी घटनेची वर्दी पोलिसात दिली आहे.