लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : रेल्वेत तिकीट तपासणीस पदाच्या नोकरीचे आमिष दाखवत नऊ लाखांचा गंडा घालून दीड वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या नाशिक येथील ठकसेन महिलेच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. तिच्या घरातच तिला जेरबंद करण्यात आले. येथील न्यायालयाने तिला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आदेश दिले आहेत.
डॉ. मनीषा प्रमोद मांदाडे (वय ५०, मूळ रा. उत्तर दादर, पश्चिम मुंबई, सध्या रा. शिवसदन रो हाऊस, तारवाला नगर, दिंडोरी रोड, पंचवटी नाशिक) असे ठकसेन महिलेचे नाव आहे. तिच्याविरुद्ध राजेंद्रकुमार कोंडिबा शिंदे (रा. तांबवे, ता. कऱ्हाड) यांनी जानेवारी २०२० मध्ये पोलिसांत फिर्याद दिली होती. डॉ. मनीषा मांदाडे हिने नऊ लाख रुपयांच्या फसवणुकीतील रक्कम जानेवारी २०१८ पासून इस्लामपूर बसस्थानक परिसरासह वेगवेगळ्या ठिकाणी घेतली होती.
शासनाच्या जलसंधारण खात्यामध्ये उच्च पदस्थ अधिकारी असणाऱ्या पतीच्या मंत्रालयात ओळखी आहेत, अशी बतावणी करीत मनीषा मांदाडे हिने शिंदे यांना भुरळ घातली. तुमच्या मुलाला भारतीय रेल्वे, मुंबई मेट्रो, नागपूर मेट्रो, आईआरसीटीसी, भारतीय कोळसा निगम किंवा भारतीय खाद्य निगममध्ये कोठेही नोकरी लावू शकते, असे सांगून २०१८ पासून शिंदे यांच्याकडून वेळोवेळी नऊ लाख रुपये उकळले.
मांदाडे हिच्या रॅकेटमध्ये कामेश्वर सिंग, हर्षल (पूर्ण नावे नाहीत), रितेश गोपाळराव मोंढे (रा. मंत्रीनगर, बेलतरोडी, नागपूर) आणि राज सिंघानिया (पूर्ण नाव नाही) हे सुद्धा सामील होते. या सर्वांच्या साथीने मांदाडे हिने शिंदे कुटुंबाला पश्चिम बंगालपर्यंतची भ्रमंती करायला लावली. मात्र, तरीदेखील मुलास नोकरी मिळत नसून फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शिंदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली होती. गेल्या दीड वर्षापासून मनीषा मांदाडे पोलिसांना चकवा देत होती. राजस्थान, दिल्ली व पश्चिम बंगालमध्ये या फसवणुकीच्या रॅकेटची पाळेमुळे पसरली असण्याची शक्यता आहे.
पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अरविंद काटे व त्यांच्या पथकाने डॉ. मांदाडे हिला नाशिक येथील घरातून अटक केली.