इस्लामपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने महावितरणच्या माध्यमातून ७५ लाख ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून ४ कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करीत आहे. या घटनेचा वाळवा तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने निषेध करण्यात आला. या नोटिसा मागे घ्याव्यात, अन्यथा बिल वितरण केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा माजी तालुका अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी दिला आहे.
मार्चपासून कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यातून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्कील होऊन गेले. याचकाळात मीटर रीडिंग न घेता अवाजवी आणि चढ्या दराने वीज आकारणी करून ही बिले ग्राहकांना पाठविली. त्यामुळे वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले गेले आहे. लॉकडाऊन काळातील वीज बिल माफ करून दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, असे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले. यावेळी धैर्यशील मोरे, संदीप सावंत, सुरेखा मटकरी, चंद्रकांत पाटील, प्रवीण परीट उपस्थित होते.