इस्लामपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार महावितरणच्या माध्यमातून ७५ लाख ग्राहकांना वीज कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे पाप करत आहे. या घटनेचा वाळवा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. या नोटिसा मागे घ्याव्यात अन्यथा बिल वितरण केंद्राला टाळे ठोकण्याचा इशारा भाजपच्या वतीने देण्यात आला.
माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कपिल ओसवाल, धैर्यशील मोरे, चंद्रकांत पाटील, नगरसेवक अमित ओसवाल, चेतन शिंदे, माजी नगरसेवक सतीश महाडिक, संदीप सावंत, गजानन फल्ले, धनराज पाटील, संजय पोरवाल, संजय हवालदार, अक्षय कोळेकर, प्रवीण परीट उपस्थित होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करणाऱ्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.
मार्चपासून कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन पुकारण्यात आला. त्यातून सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल होऊन गेले. याच काळात मीटर रिडिंग न घेता अवाजवी आणि चढ्या दराने वीज आकारणी करून सदरची बिले ग्राहकांना पाठविली. त्यामुळे वीज ग्राहकांचे कंबरडे मोडले गेले आहे. लॉकडाऊनच्या काळातील वीज बिल माफ करून दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, असे निवेदन कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले.
फोटो - ०५०२२०२१-आयएसएलएम-भाजप आंदोलन न्यूज
इस्लामपूर येथे भाजपच्या वतीने वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता भाेसले यांना भगवानराव साळुंखे, धैर्यशील मोरे, संदीप सावंत, अमित ओसवाल यांनी निवेदन दिले.