लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : वाळवा, शिराळा तालुक्यांत कोरोना रुग्णांची संख्या तिपटीने वाढल्याने उपचारासाठी बेडची कमतरता भासत आहे. सर्वसामान्य रुग्णांवर वेळेत उपचार होत नसल्याने मृत्यूचा दर वाढत आहे. त्यामुळे इस्लामपूर येथे जम्बो कोविड सेंटर होणार का, असा सवाल लोकप्रतिनिधींना विचारला जात आहे.
वाळवा व शिराळ्यात रोज तीनशेच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. त्यांच्यावर वेळेत उपचार होत नाहीत. सुविधा अपुऱ्या पडत आहेत. शिराळा आणि कोकरूड येथे असलेल्या शासकीय कोविड केंद्रांवर सुविधा कमी आहेत. त्यामुळे या परिसरातील रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचे बेड मिळविण्यासाठी इस्लामपूर येथे धावाधाव करीत आहेत. परंतु इस्लामपुरातही बेडची कमतरता आहे. काही रुग्णालयांनी बेड वाढविण्याची परवानगी मागितली आहे, परंतु प्रशिक्षित कर्मचारी नसल्याने परवानगी मिळत नाही. त्यामुळे रुग्णांना सांगली, मिरज, कोल्हापूर किंवा पुणे येथे जावे लागते. तेथेही बेड उपलब्ध नसल्यामुळे हाल होत आहेत. काही रुग्ण ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरअभावी दगावले आहेत.
आता पालकमंत्री जयंत पाटील, आ. मानसिंगराव नाईक, खा. धैर्यशील माने, आ. सदाभाऊ खोत यांनी कोरोनाच्या महामारीत राजकारण न करता एकत्रित येऊन इस्लामपूर येथे ५०० ते ७०० बेडचे जम्बो कोविड सेंटर उभे करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
चौकट
संस्थांची मदत घ्या
इस्लामपूर शहर व परिसरात हजार बेडच्या व्यवस्थेसाठी मोठी मंगल कार्यालये आहेत. तेथे जम्बो कोविड सेंटर उभी राहू शकतात. या दोन्ही तालुक्यांत राष्ट्रवादीकडे चार साखर कारखाने, सहकारी आणि वित्तीय संस्था आहेत. त्या सर्व सक्षम आहेत. त्या माध्यमातून आरोग्य यंत्रणा उभी राहू शकते. काही सामाजिक संस्था रुग्णांसाठी मदत देऊ शकतात.