दुधगाव : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय शेतकरी सहकारी साखर कारखाना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेली दहा-बारा वर्षे सभासदांचा ऊस बिगर ऊस उत्पादक म्हणून तोडला जातो. यामुळे कारखान्याच्या सोळा हजार सभासदांना कधी न्याय मिळणार, अशी चर्चा मिरज पश्चिम भागात सुरू आहे.
पालकमंत्री जयंत पाटील व दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांचा कारखान्याच्या मालकीवरून वाद सुरू आहे. कारंदवाडीजवळील सर्वोदय साखर कारखान्याची उभारणी माजी आमदार व्यंकप्पा पत्की, माजी आमदार शरद पाटील, आमदार संभाजी पवार या त्रिमूर्तींनी १९९९ ते २००० मध्ये केली. वाळवा, सांगली, मिरज पूर्व आणि पश्चिम असे या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात ४८ गावांचा समावेश आहे. २००५ मध्ये महापुरामुळे कारखाना अडचणीत आला. २००८ मध्ये सर्वोदय साखर कारखान्यांना राजारामबापू कारखान्याला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला होता. त्यांची तीन वर्षांची मुदत २०११ मध्ये संपली. तेव्हापासून त्यांचे पैसे परत देऊन हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी संभाजी पवार गटाचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी न्यायालयीन लढाई चालू आहे. राजारामबापू कारखान्याचे किती पैसे भरायचे, इतकाच वादाचा विषय आहे.
हा कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा यासाठी संभाजी पवार गटाने राजारामबापू कारखान्यासोबत न्यायालयीन लढाई सुरू केली. हा कारखाना सभासदांचा होण्यासाठी मिरज पश्चिम भागातील काही सभासदांनी आपले सोने-नाणे गहाण ठेवून तसेच सहकारी पतसंस्थेचे कर्जदेखील घेतले आहे.
चौकट
असा झाला वाद
सर्वोदय साखर कारखान्यासमोर २००८ मध्ये आर्थिक संकट निर्माण झाल्याने राजारामबापू पाटील कारखान्याला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला होता. त्यानंतर करार संपल्यानंतर पैसे परत देण्याची तयारी करूनदेखील राजारामबापू कारखाना ताबा सोडण्यास तयार नाही. तेव्हापासून आज अखेर न्यायालयात वाद सुरू आहे.