कवठेमहांकाळ : तासगावमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत गुन्हेगारांनी कहर केला आहे. ही लोकशाहीच्या इतिहासातील दुर्दैवी घटना आहे. मग अशा गुंडगिरी प्रवृत्तीला आपण पोसायचे का? त्यांना आपण संधी द्यायची का?, असा सवाल आ. पतंगराव कदम यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव न घेता केला. दरम्यान, अशा प्रवृत्तींना जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.कवठेमहांकाळ येथे मंगळवारी शेतकरी दूध संघाच्या सभागृहात वसंतदादा रयत पॅनेलच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व मतदारांची सभा पार पडली. यावेळी कदम बोलत होते.कदम म्हणाले की, माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात मी संस्था वाढविण्याचे व सुदृढ ठेवण्याचे काम केले. संस्था काढायच्या व मोडायच्या हा उद्योग कधीच केला नाही. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीत मिरज, कवठेमहांकाळ, जतच्या लोकांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा वचक होता. परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘सांगली चिल्लर’ झाली आहे. वसंतदादांच्या पश्चात सांगलीचा दबदबा राहिला नाही. हा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी जनतेने आपल्याला ताकद व आशीर्वाद द्यावेत.सांगलीच्या राजकारणात ‘सत्तापिपासू’ टोळ्या निर्माण झाल्या आहेत. टोळ्या करून सत्ता भोगायची अन् स्वार्थ साधायचा, असे उद्योग या टोळ्यांनी आजवर जिल्ह्यात केले आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी अशा टोळ्या मतदारांनी राजकारणातून हद्दपार कराव्यात. लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकारणाला गुंडगिरीचा वास येऊ लागला आहे. त्यामुळे अशा लोकांना संधी द्यायची का, याबाबतचा निर्णय मतदारांनी घ्यावा, असे ते म्हणाले. अजितराव घोरपडे म्हणाले, शेती व शेतकऱ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून मतदारांनी काठावर विजयी करू नये, तर भरघोस मतांनी विजयी करावे. बाजार समितीचा निकाल भविष्यातील राजकारणाला कलाटणी देणारा असेल. शेतकऱ्यांसाठी भविष्यात बरेच काही करायचे आहे. त्यामुळे त्यादृष्टीने मतदारांनी कौल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत माजी आमदार दिनकर पाटील, आप्पासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांचीही भाषणे झाली. सभेस आनंदराव मोहिते, राजवर्धन घोरपडे, बाळासाहेब गुरव, माणिकराव भोसले, उदयसिंह शिंदे, सुनील माळी, तानाजी यमगर उपस्थित होते. (वार्ताहर)राजकारण स्वच्छ करायचे आहे...पतंगराव कदम म्हणाले की, जिल्ह्यातील राजकारणात गदारोळ सुरू आहे. बऱ्याच अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. भानगडीही बऱ्याच सुरू असतात. अशा परिस्थितीत स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतली आहे. काही संस्थांमध्ये याचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. आता बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय स्वच्छता करायची आहे. ही स्वच्छता झाली की, समितीचा कारभार चांगल्या पद्धतीने करता येईल. बाजार समितीमधून जतला वगळण्याचा डाव काहीजणांनी आखला होता. आपण तो यशस्वी होऊ दिला नाही. यापुढेही आम्ही या तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही. बाजार समितीशी संबंधित जत, कवठेमहांकाळ व मिरज पूर्व हे भाग दुष्काळी आहेत. त्यामुळे या दुष्काळी भागाच्या विकासाकरिता आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पतंगराव कदम म्हणाले.
गुंडगिरी करणाऱ्यांना निवडून देणार का?
By admin | Updated: August 4, 2015 23:35 IST