मिरज-मालगाव रस्त्यावरून मिरज पूर्व भागात व कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस महापालिका क्षेत्रात कलावतीनगर, इंदिरानगर, दत्त कॉलनी, खोतनगर, महादेव कॉलनी, एकता कॉलनी, अमननगर ही सुमारे २५ हजार लोकसंख्येची उपनगरे आहेत.
दिंडीवेसजवळ ओढ्याजवळच अनेक लहान नाले आहेत. पावसाळ्यात नाल्यातील पाणी ओढ्यात मिसळते. मालगाव रस्त्यावर अनेक मालमत्ताधारकांनी नैसर्गिक नाल्यावर अतिक्रमण करून घरे बांधले आहेत. अनेकांनी तर नैसर्गिक नालाच बुजवून त्यावर भंगार विक्री दुकाने थाटली आहेत. यामुळे अरुंद रस्त्यावर दररोज अपघात घडत आहेत. मिरज-मालगाव रस्त्यावर दिंडीवेस ते सुभाषनगर या महापालिका क्षेत्रातील रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाने दुकानांचे अतिक्रमण हटवून रस्ता रुंदीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. सुधार समितीचे अॅड. ए. ए. काझी, अध्यक्ष जावेद पटेल, उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील, गीतांजली पाटील, असिफ निपाणीकर, शंकर परदेशी, मुस्तफा बुजरूक, संतोष माने, श्रीकांत महाजन, जहीर मुजावर, नय्यूम नदाफ यांनी सदस्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता संतोष रोकडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.