अशोक पाटील - इस्लामपूर वाळवा व शिराळा तालुक्यातील विविध सहकारी सोसायट्या, बँका, पतसंस्था, कारखाने आदींच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. सद्यस्थितीत अशा संस्थांवर संचालक म्हणून जाण्यासाठी कोणालाही स्वारस्य राहिलेले नाही. वर्षानुवर्षे जे संचालक पदावर कार्यरत आहेत, तेच पुन्हा बिनविरोध निवडून येत आहेत. काही घराणी सोडली, तर इतरांकडून लष्कराच्या भाकरी भाजण्यापेक्षा शेतीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जात आहे.वाळवा व शिराळा तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कट्टर विरोधी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून संस्था बिनविरोध केल्या आहेत. जे वर्षानुवर्षे संस्थांवर कार्यरत आहेत, तेच पुन्हा त्या पदावर दिसत आहेत. नवीन चेहरे मात्र सध्या या निवडणुकीकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कसलीही स्पर्धा नसल्याने ऐन उन्हाळ्यात शांतता पसरली आहे.राजारामबापू साखर कारखाना, राजारामबापू दूध संघ, राजारामबापू बँक या संस्था सक्षम आहेत. या संस्थेवर ठराविक घराण्यांचीच मक्तेदारी आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गत निवडणुकीत नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून संचालकपदे वाटून घेऊन निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे यावेळीही निवडणुकीत स्मशानशांतता दिसत आहे. राजारामबापू कारखान्याच्या निवडणुकीत रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे तोकडे आव्हान असते. बहुतांश जागा बिनविरोध होत असतात. त्यामुळे यावेळची निवडणूकही बिनविरोधच होण्याची शक्यता आहे. दूध संघ व बँकेवर आमदार जयंत पाटील ठरवतील त्यांनाच संचालक पदाची संधी दिली जाते. त्यामुळे इच्छा असूनही बहुतांशी कार्यकर्ते निवडणुकीपासून अलिप्तच राहतात. अशीच अवस्था राजारामबापू उद्योग समूहातील सर्वच सहकारी संस्थांची आहे. त्यामुळे संस्थांच्या निवडणुकीत नेहमीचे चेहरे सोडले, तर इतर कोणालाही स्वारस्य राहिलेले नाही. त्यांनी आता आधुनिक शेती करण्यावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.गावाच्या विकासाला प्राधान्यआमदार शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी संघर्ष झाला होता. त्यात सत्यजित देशमुख यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचीही भर पडली होती. शिराळा तालुक्यातील या तीन नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी बहुतांश सेवा सोसायट्या बिनविरोध करीत गावाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.
कशाला पाहिजे संचालकपद?
By admin | Updated: April 2, 2015 00:43 IST