लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : वाहतूक नियमांना बासनात गुंडाळत ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. शहरासह ग्रामीण भागातही हे प्रकार वाढत असल्याने वाहतूक नियमांचे उल्लंघन तर होतेच शिवाय अपघाताचीही शक्यता असताना, त्याकडे सर्रास दुर्लक्ष करत ट्रीपल सीट जाणाऱ्यांत तरुणांचे प्रमाण जास्त आहे. पोलिसांनीही त्यांच्यावर कारवाई करत १७ लाखांचा दंड वसूल केला आहे.
पोलिसांकडून ट्रीपल सीट प्रवास करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाते तरीही नियम मोडणाऱ्यांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यामुळेच आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्याही मदतीने वाहनचालकांवर कारवाई केली जात आहे. अनेक वाहनचालक गरज म्हणून तर बहुतांश तरूण केवळ हौस म्हणून ट्रीपल सीटने प्रवास करून स्वत: अडचणीत येत आहेत.
चौकट
दुचाकी वाहनचालकांनो, हे नियम पाळा
* कोणत्याही मार्गावरील प्रवास असो, ट्रीपल सीटने प्रवास टाळा.
* मोटारसायकल चालवत असताना, मोबाईलवर संभाषण करणे टाळा.
* सध्या कोरोना संसर्गाचा विचार करता, मास्कचा वापर करूनच प्रवास करा.
* ग्रामीण भागात फिरताना, सुरक्षित प्रवासासाठी हेल्मेटचा वापर करा.
* वाहनाच्या क्रमांकावर कोणत्याही प्रकारची नावं न लिहिता स्पष्ट क्रमाकांची नाेंद असावी.
* शहरात सिग्नल यंत्रणा सुरू असताना, नियम तोडून प्रवास करू नका.
चौकट
दंडाची होणार ई-चलन
जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला अधिक सुसुत्रता यावी, यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यानुसार आता वाहतूक नियम मोडल्यास पावतीऐवजी दंडाचे ई-चलन तयार होऊन ते अगदी घरपोच मिळणार असल्याने दंड टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करावे.
चौकट
किती जणांवर झाली कारवाई?
जानेवारी १०१३
फेब्रुवारी १०७६
मार्च ११६८
एप्रिल ९१४
मे ६०८
जून ११६८
जुलै १०९०
ऑगस्ट १२०२