'दत्ता पाटील -- तासगाव--माजी गृहमंत्री आर. आर. पाटील आबा यांच्या पश्चात सुमनताई पाटील यांना विधानसभेची संधी मिळाली. तरीही आबांच्या पश्चात आबा गटाची धुरा कोण वाहणार, याची कुजबूज आबा समर्थकांत सुरू होती. गेल्या काही महिन्यांत तासगाव-कवठेमहांकाळमध्ये घडणाऱ्या राजकीय घडामोडींनंतर प्रश्न विचारणारा आवाज मोठा होत आहे. आबांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, स्मिता पाटील यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे. तरीही कार्यकर्त्यांची भलीमोठी फौज असूनदेखील आबा गट डळमळीत होत आहे. याचे आत्मपरीक्षण नेते करोत अथवा न करोत, पण सामान्य कार्यकर्त्यांतून मात्र, आबा गटाचे नेमके सूत्रधार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.एकेकाळी जिल्ह्यासह राज्यात मुलुखमैदानी तोफ म्हणून माजी गृहमंत्री आर. आर. पाटील परिचित होते. त्यांनी गटा-तटाचे राजकारण केले नाही. मात्र अनेक गटा-तटांना सामावून घेतले. अशा आबांचा मतदारसंघासह जिल्ह्यातही एक गट निर्माण झाला. तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघावर तर त्यांचे एकहाती प्रभुत्व होते. मात्र त्यांच्या पश्चात वर्षभरातच आबा गटातील कार्यकर्ते डळमळीत होताना दिसत आहेत. यानिमित्ताने आबा गटाचा सूत्रधार कोण? हा दबक्या आवाजातील प्रश्न आता मोठ्या आवाजात विचारला जात आहे. तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीत आबा गटाच्या शिलेदारांनी काका गटाचा धुव्वा उडविला. त्यामुळे आबांच्या पश्चातही बालेकिल्ला मजबूत असल्याचे कार्यकर्त्यांनी दाखवून दिले. मात्र या विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना असले तरी, आबांनी यापूर्वी केलेल्या ग्रामपंचायत, सोसायट्यांतील कामाची पुण्याईही कामी आली होती, हे नाकारून चालणार नाही. मात्र आबांची सहानुभूती फार काळ टिकणार नसल्याची चुणूक संजयकाकांनी नगरपालिकेत दाखवून दिली. इतकी वर्षे आबांच्या सत्तेची फळे चाखलेल्या त्यांच्या समर्थकांनी आता काकांचा आसरा घेण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादीकडे आबाही नाहीत आणि सत्ताही नाही. अशी अवस्था आहेच. पण त्यापेक्षाही आता आबांची जागा घेणारेही कोणी नाही, अशी भावनाही कार्यकर्त्यांच्या मनात घर करून आहे. आबांच्या पश्चात आमदार सुमनताई पाटील, जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील आणि स्मिता पाटील अशा तीनखांबी नेतृत्वाकडून डोलारा सांभाळण्याचा प्रयत्न होत आहे. तरीही कार्यकर्ता डळमळीत होताना दिसून येत आहे. आज तासगाव शहरात झाले, उद्या ग्रामीण भागात का होणार नाही, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. अर्थात शहरातील आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील राजकीय परिस्थिती भिन्न आहे. ग्रामीण भागातील कार्यकर्ता सहजासहजी स्वाभिमान आणि निष्ठा, दुसऱ्या गटाकडे गहाण ठेवत नाही. त्यामुळे नाराजी असूनदेखील काही पदाधिकाऱ्यांनी आबा गट सोडलेला नाही. आबा गटाचे नेतृत्व करणाऱ्यांना, आबांची पुण्याई फार काळ तारणार नाही, याची जाणीव ठेवूनच राजकीय वाटचाल करावी लागणार आहे. आबा गटाचा प्रत्येक शिलेदार आपापला गट सांभाळण्याच्या मानसिकतेत आहे. मात्र सामान्य कार्यकर्त्यांची कामे मार्गी लागल्याशिवाय कार्यकर्ता सोबत करणार नाही, याची जाणीव ठेवून आक्रमक नेतृत्व तयार झाले तरच राष्ट्रवादीचा उर्वरित गड अभेद्य राहणार आहे, मात्र हे करण्यासाठी नेतृत्व कोण आणि कसे करणार, हे कृतीतून दाखवून द्यायला हवे.का पडला प्रश्न? आबांचे नेतृत्व एकखांबी होते. त्यांच्या कारकीर्दीत कार्यकर्त्यांची कामे चुटकीसरशी मार्गी लागायची. मात्र त्यांच्या पश्चात आबांच्या घरातच नेतृत्वाचा त्रिकोण तयार झाला आहे. या त्रिकोणातच आबा गटातील कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे. मुळातच आबांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचेच गावागावात गटतट आहेत. आता हे गट सोयीनुसार सुमनताई, सुरेश पाटील, स्मिता पाटील यांच्यासोबत आहेत. मात्र सामान्य कार्यकर्त्याला आबांच्या पश्चात अडचण सोडवण्यासाठी नेमके कोणाकडे जाचये? असा प्रश्न पडला आहे.
तासगावमध्ये आबा गटाचे सूत्रधार कोण?
By admin | Updated: September 22, 2015 00:09 IST