सांगली : महापालिका अंत्यविधीच्या ठेक्यासाठी कमी दराची निविदा आलेली असताना प्रशासन, सत्ताधाऱ्यांनी कोणाच्या तरी लाभासाठी जादा दराची निविदा मंजूर केल्याचा आरोप मदनभाऊ युवा मंचचे जिल्हाध्यक्ष आनंदा लेंगरे यांनी केला.
लेंगरे म्हणाले, महापालिका दरवर्षी अंत्यविधीसाठी निविदा काढून देत असते. यावर्षीही अंत्यविधीचा ठेका काढला होता. मागील वर्षी एका मृतदेहासाठी २६२५ रुपये अंत्यसंस्काराचा ठेका दिला गेला होता. यावर्षी सर्वात कमी निविदा १९१६ रुपये आली आहे. मागील वर्षाचा व या वर्षाचा निविदेचा फरक ७०९ रुपये होता. महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी दहा व्यक्तींवर अंत्यसंस्कार होतात. जादा दराची निविदा मंजूर केल्याने वर्षाला २५ लाख ५२ हजार रुपयांचा बोजा महापालिकेवर पडणार आहे. सर्वात कमी दराची वर्कऑडर देण्यात आली नाही. यामागे गौडबंगाल काय, हे कळून येत नाही.
महापालिकेतील सत्ताधारी ठेक्यासंदर्भात अवाक्षरही काढायला तयार नाहीत. महापालिकेचा फायदा होत असताना जाणीवपूर्वक सत्ताधारी व प्रशासन विलंब करत आहेत. वर्कऑर्डर देण्यास महिना विलंब लावल्यामुळे महापालिकेचा सव्वादोन लाखाचा तोटा झाला आहे. याला जबाबदार कोण? सत्ताधारी व प्रशासन यांची यात मिलीभगत असल्याची शंका येत आहे. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.