११०७२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर कार्टून न्यूज
लोकमत न्यूज नेटवर्क
अशोक पाटील
इस्लामपूर : शहरातील फाळकुटदादा आणि गुंडांवर पोलिसांनी कारवाई करून बंदोबस्त केला आहे. यामध्ये काही खंडणी बहाद्दर आहेत. त्यांची जागा आता व्हाईट कॉलर असलेल्या विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी आता नामवंत डॉक्टर, सोन्या-चांदीचे व्यापारी, उद्योजक, शासकीय अधिकारी यांना लक्ष्य करून पैसे मिळवण्याचा नवीन फंडा शहरात आणला आहे.
यापूर्वी फाळकूटदादा गुंड धाब्यावर जाऊन फुकट जेवणे, चिरीमिरी स्वरुपात खंडणी मागणी, आदी व्यवसायात असणारे काही गुंड पुढे भूखंड माफिया झाले. यातून मटका व्यवसायही जोमात होता. खासगी सावकारीचेही लोण ग्रामीण भागात पोहोचले. अशा गुंडांवर तडीपार, मोक्का लावण्यात आले. त्यांची जागा आता संघटनेच्या नावाखाली व्हाईट कॉलर असलेल्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यांनी नामवंत डॉक्टर, सोन्या-चांदीचे व्यापारी, उद्योजक, महसूल विभागातील अधिकारी यांना लक्ष्य केले आहे.
दोन वर्षांपासून व्यावसायिक, उद्योजकांवर कोरोनामुळे आर्थिक संकट आले आहे. अशा परिस्थितीत केवळ वैद्यकीय सेवाच तेजीत आहेत. त्यामुळेच या पांढरपेशा खंडणी बहाद्दरांनी शहरातील डॉक्टरांना ‘टार्गेट’ केले आहे. एखाद्या रुग्णावर उपचारामध्ये झालेला हलगर्जीपणा हेरून त्यांच्या नातेवाईकांना सावज करायचे, हे प्रकरण मिटवण्यासाठी लाखो रुपयांच्या तडजोडी करण्याचा धंदा आता तेजीत सुरू झाला आहे.
चौकट
कोरोना महामारीत वाळवा तालुक्यात रुग्ण आणि मृत्यूवाढीचा रेट जास्तच आहे. त्यामुळे उपचारासाठी बेड उपलब्ध नाहीत, याचाच फायदा डॉक्टरांनी उठवला आहे. अतिरिक्त बिलाच्या तक्रारीही वाढल्या आहेत. हाच तक्रारीचा मुद्दा घेऊन डॉक्टरांना टार्गेट केले जात आहे. यामध्ये डॉ. सचिन सांगरूळकर, डॉ. योगेश जाधव हे खंडणी बहाद्दरांच्या जाळ्यात सापडले आहेत. आता खंडणी बहाद्दरांच्या रडारवर तिसरे सावज असल्याचे सांगितले जात आहे.
कोट
सामजिक संघटनेच्या नावाखाली जर कोणी तडजोडी करण्यासाठी खंडणी मागेल, अशांविरोधात तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करू. यापूर्वी अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत.
- नारायण देशमुख
पोलीस निरीक्षक, इस्लामपूर