सांगली : कोरोना रुग्णांबाबत देशात क्रमांक एकवर आलेला महाराष्ट्र आता जगात चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे या सरकारने हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी केले.
झरे (ता. आटपाडी) येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला लॉकडाऊनची धमकी देत आहेत. प्रत्येकवेळी जनतेवर कोरोना संसर्गाचे खापर फोडायचे आणि लॉकडाऊनचा इशारा द्यायचा, इतकेच काम ते करीत आहेत. लोकांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना, सर्व उद्योग, व्यवसाय बंद करून लोकांना संकटात टाकण्याचे काम हे सरकार करीत आहे.
कोरोनाची सध्याची परिस्थिती ही लोकांमुळे निर्माण झाल्याचे सांगून लोकांनाच ते सूचना देत आहेत. लोकांनीच जर सर्व काही उपाय करायचे असतील, तर सरकार नेमके काय करणार आहे? सरकारची काही जबाबदारी आहे की नाही?
मनमानी निर्णय जनतेला गृहीत धरून लादले जात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अन्य काही उपाययोजना सरकारकडे नसल्यासारखे प्रत्येकवेळी लॉकडाऊन हा एकच पर्याय घेऊन सरकार समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांत सरकारला कोरोना रोखण्यात अपयश आले आहे. हे त्यांनी आता प्रामाणिकपणाने कबूल करावे.
चौकट
राज्यातील अंधाराचे काय
एकीकडे पश्चिम बंगालमधील दिव्यांच्या कामाचे कौतुक करायचे, मात्र राज्यातील सरकारने जो अंध:कार केला आहे, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे, हा उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका पडळकरांनी केली.