सुशांत घोरपडे -म्हैसाळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या व सुमारे वीस हजार लोकसंख्या असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारी पोलीस चौकी नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. आठवड्यातून पाच दिवस ही चौकी बंदच असल्याने, एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच येथे कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नेमणार का, असा सवाल ग्रामस्थांतून होत आहे. म्हैसाळ पोलीस चौकीअंतर्गत म्हैसाळ, आरग, बेडग, लिंगनूर, शिंदेवाडी, बेडग, नरवाड, विजयनगर, बेळंकी यांसह पंधरा गावांचा समावेश होतो. या गावांची लोकसंख्या विचारात घेता, म्हैसाळ येथील पोलीस चौकीमध्ये कायमस्वरूपी कर्मचारी असण्याची आवश्यकता आहे, पण या चौकीत आठवड्यातून दोन ते तीनच दिवस पोलीस कर्मचारी हजर असतात. या परिसरात नेहमी लहान-मोठे भांडणतंटे होत असतात. गावात वेळेवर पोलीसच हजर नसल्यामुळे काही भांडणे गावातील काही कार्यकर्तेच मिटवितात. मिरजेतून म्हैसाळमार्गे कागवाड, अथणी, चिक्कोडी, विजापूरसह कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. रात्री बारानंतर म्हैसाळ बसस्थानकालगतच रस्त्याकडेला काही चालक वाहने थांबवून चहा, नाष्टा करण्यासाठी येतात. अशावेळी अपघात घडतात. वड्डीनजीक म्हैसाळ येथील एका महिलेचे दागिने चोरट्यांनी हिसडा मारून पळवून कर्नाटक हद्दीत पलायन केले होते. यापूर्वी गावात तीन खून झाले आहेत. त्याचा तपास अद्याप गुलदस्त्यातच आहे. अशा घटनांना प्रतिबंध करण्यासाठी गावात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी असावा, अशी मागणी होत आहे.चौकी बंद असल्यामुळे ग्रामस्थांची गैरसोयबसस्थानकाजवळ वाहतुकीची पूर्णपणे कोंडी होते. लहान-मोठे वाद झाल्यानंतर तक्रार करायची झाल्यास चौकी बंद असल्याने मिरजेमध्ये जाऊन नागरिक तक्रार नोंदवत नाहीत. नंतर या वादातून मारामारीच्या घटना घडतात, अशी प्रतिक्रिया नागरिक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली.म्हैसाळ औटपोस्टच्या अंतर्गत अनेक गावांचा समावेश होतो. त्यासाठी कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. या भागातील अवैध धंदे करणाऱ्यांना कायदा दाखविण्याची वेळ आली आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ता मनोज जाधव यांनी व्यक्त केले.
म्हैसाळच्या चौकीतील पोलीस गेले कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2015 00:00 IST