सांगली : महापालिकेची महासभा चार दिवसांवर येऊन ठेपली तरी प्रशासनाकडून नगरसेवकांना विषयपत्रे देण्यात आलेली नाहीत. मागणी करुनही विषयपत्रे मिळत नाहीत. यामागचे गौडबंगाल काय, असा प्रश्न भाजपचे गटनेते विनायक सिंहासने यांनी उपस्थित केला आहे.
महापौर दिग्वीजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली येत्या बुधवारी, १२ मे रोजी महासभेचे आयोजन केले आहे, पण विषयपत्रे अनेक नगरसेवकांना मागणी करुनही मिळालेली नाहीत. याबाबत नाराजी व्यक्त करत सिंहासने म्हणाले की, कोरोना संकटामुळे महासभा ऑनलाईन घेण्यात येतात. प्रशासन महासभा अजेंडा काढते. मात्र, विषयपत्रे देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. प्रत्येक महासभेवेळी असा प्रकार होतो. नगरसेवकांना मागणी करुनही विषयपत्रे दिली जात नाहीत.
प्रशासनाकडून अनेकवेळा वादग्रस्त विषय महासभेपुढे ठेवले जातात. अधिकाऱ्यांकडेही या विषयांबाबत सखोल माहिती नसते. पार्टी मिटिंगकडेही अधिकारी जाणीवपूर्वक पाठ फिरवतात, त्यामुळे संबंधित विषयांची अपेक्षित माहिती नगरसेवकांना मिळत नाही. त्यामुळे महासभेत अशा विषयांवर काय बोलायचे, हे नगरसेवकांना कळत नाही. समर्पक मुद्दे मांडता येत नाहीत. विषयपत्र मिळावीत म्हणून नगरसेवक नगर सचिवांकडे वारंवार हेलपाटे मारतात, मात्र त्यांना ती दिली जात नाहीत.