एडिटोरिअलवर २९ सांगली ०२ : केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांना केंद्रीय विद्यालय उभारणीसाठी खासदार संजयकाका पाटील यांनी निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली जिल्ह्यात नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करावे, अशी मागणी खासदार संजयकाका पाटील यांनी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या मागणीस त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, केंद्रीय विद्यालय स्थापन करण्यासाठी अहवाल मागवण्यात येईल, असे आश्वासन दिले.
खासदार पाटील यांनी दिल्लीत धोत्रे यांची भेट घेऊन निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी, तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी येथे केंद्रीय विद्यालय असणे आवश्यक आहे. पुणे व सोलापूर येथे केंद्रीय विद्यालये अस्तित्वात असून सांगली, सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यांत मात्र एकही केंद्रीय विद्यालय नाही.
केंद्रीय विद्यालयात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या पाल्यांना पुणे किंवा सोलापूरला जावे लागते. सांगली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनाही केंद्रीय विद्यालयात शिकता यावे, यासाठी जिल्ह्यात नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करावे, अशी मागणी केली.
सांगली जिल्ह्यात नवीन केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या मागणीस धोत्रे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विद्यालय स्थापन करण्यासाठी लवकरच याबाबतचा अहवाल मागवण्यात येईल, असे स्पष्ट केले.