लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : कोरोनाच्या महामारीमुळे दहावी व बारावीच्या परीक्षा राज्य शासनाने रद्द केल्या आहेत. मात्र, त्यापूर्वी लाखो विद्यार्थ्यांचे करोडो रुपयांचे परीक्षा शुल्क भरून घेण्यात आले आहे. ते शुल्क विद्यार्थ्यांना शासनाने परत केले नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कावर जर राज्य शासन सरकार चालवत असेल तर मनसेच्यावतीने गावो-गावी भीक मागून पैसे जमा करून सरकार चालविण्यास देऊ, असा इशारा खानापूर तालुका विद्यार्थी सेनेच्यावतीने शिक्षण मंत्र्यांना देण्यात आला.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्र्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे ऑनलाईन होणार असल्याचे सांगितले. या निर्णयावर पालक व विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला. वर्षभर ऑनलाईन शिक्षण दिल्यावर परीक्षा ऑफलाईन घेणार हा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात उपस्थित झाला होता. काही दिवसातच सरकार व प्रशासन यांनी कोरोना संसर्ग वाढत असल्याने अशा कठीण परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य नसल्याचे कारण सांगत परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, दहावी व बारावी परीक्षेसाठी शासनाकडे विद्यार्थ्यांकडून जमा झालेली कोट्यवधी रुपयांची परीक्षा फी अद्याप परत दिली नाही. त्या परीक्षा फीवर शासन त्यांचे सरकार चालवित असेल तर मनसेच्यावतीने गावागावात जाऊन भीक मागून सरकारसाठी पैसे जमा केले जातील व ती जमा झालेली रक्कम सरकार चालविण्यास दिली जाईल, असा इशारा देण्यात आला.
याबाबतचे निवेदन मनसेचे तालुकाध्यक्ष साजीद आगा यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सेनेच्यावतीने तहसीलदार ऋषीकेष शेळके यांना देण्यात आले. यावेळी सुजित पोद्दार, गणेश जाधव, विनोद कांबळे, अनिकेत साठे, सूरज तांबोळी, अपुल बुधावले उपस्थित होते.