कोकरुड : शिराळा पश्चिम भाग आणि चांदोली धरणातून अद्यापही ८,२४० क्युसेक एवढा विसर्ग सुरु आहे. यामुळे चरण-सोंडोली, कोकरुड-रेठरे पुलांवर सलग सहाव्या दिवशी पूरस्थिती कायम आहे. आता पूर ओसरण्याची प्रतीक्षा नागरिकांना आहे.
शिराळा पश्चिम भागात पावसाने उघडीप दिली आहे. अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यातच चांदोली धरणातून अद्यापही ८,२४० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. एक-एक इंचाने पाणी उतरत आहे. गेल्या आठ दिवसांत वारणा नदीकाठी असणारी मका, ऊस, जनावरांची शेड, शेतीची अवजारे, पाणी इंजिन, विद्युुत पंप पाण्याखाली असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. चरण-सोंडोली, कोकरुड-रेठरे पुलावर सलग सहाव्या दिवशी पाणी असल्याने पश्चिम भागात पूरपरिस्थिती कायम आहे. लोकांना पाणी ओसरण्याची प्रतीक्षा असून, पाणी ओसरण्यास आणखी एक दिवसाचा अवधी लागणार आहे.