दरीबडची : सिद्धनाथ (ता. जत) येथील लघु पाटबंधारे तलावातील पाणी कालव्यातून तीन वर्षांनंतर प्रथमच रब्बी हंगामातील पिकासाठी सोडण्यात येणार आहे. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. पाणी कालव्यात सोडण्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. दरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द या तीनही गावातील १२७८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. पाणी सोडल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. पाण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.पूर्व भागातील सिद्धनाथ येथील लघुपाटबंधारे तलाव १९७२ मध्ये बांधण्यात आला. तलावाची साठवण क्षमता १०२.७३ द.ल.घ.फू. इतकी आहे. तलावापासून ८ किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात आला आहे. तलावापासून ३ कि.मी. कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे. यावर्षी मान्सून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तीन वर्षानंतर प्रथमच तलाव सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरला आहे.कालव्याच्या पाण्याने दरीबडची येथील ३८६ हेक्टर, सिद्धनाथ येथील ५५० हेक्टर, जालिहाळ खुर्द येथील ३४२ हेक्टर क्षेत्र तलावामुळे ओलिताखाली येते. पाणी व्यवस्थापन विठ्ठल पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून केले जाते. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी वेळेवर झाली आहे. पुरेशी ओल, अनुकूल हवामान यामुळे पिकांची उगवण चांगली झाली आहे. ज्वारी, मका, गहू ही पिके जोमात आली आहेत. सध्या विजेचा पुरवठा अनियमित आहे. तसेच विहीर, कूपनलिकेतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज आहे. तलावातील पाणी सोडल्यास पिकांना फायदा होणार आहे.याबाबत ‘सिद्धनाथ तलावाचे पाणी कालव्यात सोडा’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांची ही मागणी व ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. सिद्धनाथ, दरीबडची गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरी आहेत. पिण्याचे पाणी आरक्षित ठेवून पाणी सोडले जाणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्याबाबत शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)फळबागांना फायदादरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द या तीन गावांमध्ये द्राक्षे, डाळिंब फळबागेचे क्षेत्र अधिक आहे. कालव्यातील पाण्याचा फायदा बागांना होणार आहे. सध्या डाळिंब बागा बहरत आहेत, तर द्राक्षबागा लिंबोळीच्या आकारातील आहेत. कालव्यातील पाण्याने विहीर, कूपनलिकांना पाणी वाढणार आहे. भूमिगत पाण्याची पातळी वाढणार आहे.
सिद्धनाथ तलावातील पाणी रब्बी पिकांना
By admin | Updated: December 26, 2014 00:20 IST