सांगली : वारणा व कोयना धरण पाणलोट क्षेत्रातून विसर्ग सुुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मंगळवारी मोठी वाढ झाली. सांगलीतील पाणीपातळी आता १९ फुटांवर गेली आहे. येत्या दोन दिवसांत विसर्ग कायम राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील पावसाचा जोर मंगळवारी कमी झाला. दिवसभर पावसाच्या तुरळक सरींनी हजेरी लावली. ढगांची दाटी कायम आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या सहा दिवसांत मोठ्या पावसाची चिन्हे नाहीत. जिल्ह्याच्या काही भागात ढगाळ वातावरण व तुरळक पावसाची चिन्हे आहेत. वारणा व कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोरही मंगळवारी कमी झाला. कोयना धरण परिसरात दिवसभरात सरासरी २१ मि.मी., तर वारणा धरण क्षेत्रात २ मि.मी. पावसाची नोंद झाली.
पावसाचा जोर कमी झाला असला, तरी धरणे फुल्ल झाल्यामुळे गेल्या दोन दिवसांत विसर्ग वाढविण्यात आला आहे. मंगळवारी कोयनेतील विसर्ग वाढविण्यात आला असून सध्या ४९ हजार ४९१ क्युसेक कोयनेतून तर वारणा धरणातून ६ हजार ४३८ क्युसेक विसर्ग सुरु आहे. कोयनेतील विसर्ग वाढल्यामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीच्या पाणीपातळीत गतीने वाढ होत आहे. येत्या दोन दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
चौकट
जिल्ह्यातील कृष्णा नदीची पाणीपातळी (फूट)
बहे ११.७
ताकारी २६.४
भिलवडी २४.४
आयर्विन १९
अंकली २२.४
म्हैसाळ २९.६