फोटो ओळ : शिराळा तालुक्यातील शेडगेवाडी-कोकरुड मार्गावर खुजगाव येथे जलसेतुला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वारणावती : शिराळा तालुक्यातील खुजगावनजीक जलसेतुला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. या ठिकाणी वापरण्यात आलेले रबर जीर्ण झाल्याने पाण्याच्या प्रचंड दाबाने फाटले आहे. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शेडगेवाडी ते कोकरूड मर्गावर ही गळती झाली आहे.
चांदोली धरणातून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्यात आले आहे. या वर्षीचे हे पहीलेच आर्वतन आहे. परंतु कालव्याची दुरुस्ती न करताच पाणी सोडण्यात येत आहे. गुरुवारी दि. ११ मार्च रोजी मध्यरात्री जल सेतूच्या डाव्या बाजूचे जाॅइंट रबर तुटले, तर शुक्रवारी सकाळी उजव्या बाजूचे रबर तुटले. यामुळे जल सेतूला मोठे भगदाड पडले. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी असताना लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. शिवाय गळती झालेले पाणी परिसरातील शेतात साचल्याने पिकांना धोका निर्माण झाला आहे.
शेडगेवाडी, शिराळा, शेडगेवाडी कोकरूडमार्गे मलकापूर, रत्नागिरी, कोल्हापूरकडे जाण्यासाठी शेडगेवाडी ते कोकरूड हा एकमेव मार्ग आहे. यामुळे येथे नेहमी वाहनांची वर्दळ सुरु असते. त्यातच या जलसेतुजवळ धोकादायक वळण असल्याने छोटे-मोठे अपघात होत आहेत. यात काहींना जीव गमवावा लागला आहे. संबंधित विभागाने ही बाब गांभीर्याने घेऊन जलसेतुची दुरुस्ती करणे गरजेचे आहे अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
कोटशिराळा तालुक्यातील उत्तर विभागातून पाण्याची मागणी होती. यामुळे पाणी सोडले आहे. पाण्याच्या दाबाने रबर तुटले असून, आम्ही हे आवर्तन रविवारी बंद करून याची दुरुस्ती करणार आहे.
- एस. ए. मुजावर
कनिष्ठ अभियंता पाटबंधारे, कोकरुड