सांगली : गेल्या सहा महिन्यांपासून पाणी बिलाचे दर्शन न झालेल्या नागरिकांच्या दारी येत्या आठवडाभरात पाणीबिले प्रकट होणार आहेत. कोणतेही दंड, व्याज न आकारता नागरिकांना सहामाही बिले दिली जाणार असून, जुन्या थकबाकीदारांना मात्र दंड, व्याज लागू केले जाणार आहे. महापालिका आणि एचसीएल कंपनीच्या वादात बहुतांश विभागाचा डाटा कंपनीच्या सर्व्हरअभावी अडकल्याने सध्या कराची मोठी थकबाकी प्रशासनाला सतावत आहे. ई-गव्हर्नन्सअंतर्गत नियुक्त एचसीएल कंपनीशी महापालिकेचे बिनसल्यानंतर कंपनीने आपला कारभार बंद केला. सर्व्हर अणि त्यामाध्यमातून सर्व डाटा कंपनीकडे अडकल्यामुळे पाणीपट्टी व घरपट्टीची बिले महापालिकेला गेल्या सहा महिन्यांपासून काढता आली नाहीत. महापालिकेच्या संगणक विभागाने या दोन्ही महसुली विभागांचे विघ्न दूर केले असून, घरपट्टीची १ लाखावर बिले निघाली आहेत. येत्या आठवडाभरात पाण्याची ६0 हजारावर बिले वितरित केली जाणार आहेत. सहा महिन्यांचे एकत्रित पाणीबिल नागरिकांना एकाचवेळी भरावे लागणार आहे. नागरिकांवर आर्थिक भार पडणार असला तरी सहा महिने त्यांना आर्थिक दिलासाही मिळाला होता. त्यामुळे ही बिले भरण्यासाठी कोणतीही सवलत मिळणार नाही. आॅक्टोबर व नोव्हेंबरची बिलेही लगेचच नागरिकांना दिली जाणार आहेत. एप्रिलपूर्वीची ज्यांची थकबाकी आहे त्यांना दंड व व्याज भरावे लागणार आहे. महापालिकेच्या तांत्रिक अडचणींमुळे ज्यांना बिले मिळाली नाहीत, त्यांनाच या दंड, व्याजातून वगळण्यात आले आहे. चालू बिलांची थकबाकी राहिली तर त्यावर पुन्हा दंड, व्याज लावला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला जुनी थकबाकी ८ कोटी व चालू आर्थिक वर्षाची एकूण मागणी १२ कोटी असे एकूण २0 कोटीचे उद्दिष्ट आहे. यापैकी सुमारे पाच कोटी रुपये वसूल झाले आहेत. डिसेंबरपासून वसुलीस आणखी वेग येण्याची आशा या विभागाला आहे. (प्रतिनिधी)घरपट्टीचीही चिंता दूर घरपट्टी विभागासमोरही कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीचा प्रश्न आहे. बिलांचा प्रश्न मिटल्याने आता वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना राबावे लागणार आहे. वारंवार सूचना देऊनही ज्यांनी पूर्वीपासून घरपट्टी भरली नाही, त्यांना जप्तीच्या नोटिसाही बजावल्या जाणार आहेत.
पाणीबिले येताहेत हो!
By admin | Updated: November 16, 2014 23:47 IST