लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : विटा शहराने स्वच्छतेत केलेले काम अव्वल दर्जाचे आहे. कचरा विलगीकरणासह तेथे कचऱ्यावर होत असलेल्या विविध प्रक्रिया पाहिल्या तर विटा हे नजीकच्या काळातील सांगली जिल्ह्यातील पहिले ग्रीन शहर म्हणून नावलौकिक मिळवेल, असे गौरवोद्गार पालकमंत्री जयंत पाटील यांनी काढले.
विटा नगरपरिषदेच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन रविवारी रात्री पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी आ. सदाशिवराव पाटील, अशोकराव गायकवाड, अॅड. बाबासाहेब मुळीक, नगराध्यक्षा प्रतिभा पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले, माजी आ. अॅड. सदाशिवराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील नेतृत्वाखाली नगरपालिकेचे काम चांगल्याप्रकारे सुरू आहे. अनेक ठिकाणी बगीचे उभारण्याचे काम करण्यात आले आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यांत विटा शहर हे जिल्ह्यातील सर्वांत जास्त ग्रीन शहर होईल. विटा पालिकेच्या सत्ताधारी टीमने शहराची चांगली प्रगती केली आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, फडणवीस यांनी जगाचा अभ्यास चांगला केलेला दिसतोय. जगातील अनेक देशांत लॉकडाऊन आणि तेथील सरकारने कोरोनाबाबत राबविलेली धोरणे व उपाययोजना याबद्दल फडणवीस माहिती देतात; परंतु ते भारताचा उल्लेख करीत नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार कोरोना उपाययोजनांत अपयशी ठरतंय काय? असा प्रश्न मला पडला आहे. राज्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विविध उपाययोजना राबवीत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उपनगराध्यक्षा सारिका सपकाळ, अॅड. अजित गायकवाड, मुख्याधिकारी अतुल पाटील, सचिन शितोळे, प्रशांत कांबळे, अविनाश चोथे, भरत कांबळे उपस्थित होते.