सांगली : विधानसभा निवडणुकीचे मतदान तोंडावर असताना माजी खासदार प्रतीक पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्याबाबत जे निरर्थक वक्तव्य केले, त्यातून त्यांच्यात राजकीय पोक्तपणा नाही हेच दिसून आले. जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारातही त्यांनी सहभाग घेतला नाही, ही तर मोठी शोकांतिकाच असल्याचे मत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केले. पलूस-कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजप यांचे साटेलोटे असले तरी, तेथून पतंगराव कदमच चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. विश्वजित कदम म्हणाले की, प्रतीक पाटील यांनी केलेले वक्तव्य पक्षाच्यादृष्टीने हानीकारकच होते. त्यांचा राग नक्की कोणावर आणि कशासाठी होता, हे मात्र समजू शकले नाही. ऐन निवडणुकीच्या काळात पक्षाचे नुकसान होईल असे वक्तव्य करणे योग्य नाही, हे त्यांच्या लक्षात यायला हवे होते. याउलट जिल्ह्यात काँग्रेसला अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी त्यांनी स्वत:हून प्रचारात सहभाग घ्यायला हवा होता. अर्थात त्यांचे म्हणणे कोणीच फारसे गांभीर्याने घेत नाही.लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन यंदा युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर विशेष लक्ष केंद्रित केले होते. जिल्ह्यात पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचार केल्याने किमान पाच विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचाच झेंडा फडकेल. पलूस-कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीने ‘फेक’ उमेदवारच उभा केला होता. राष्ट्रवादीला कोणतीच विचारधारा नसल्याने केवळ काँग्रेसचा पराभव करण्यासाठी त्यांची बहुतांशी टीम उघडपणे भाजपच्या प्रचारात सहभागी झाली होती. असे असले तरीही पलूस-कडेगाव मतदारसंघातील नागरिकांशी कदम कुटुंबियांचे आपुलकीचे नाते आहे. निवडणूक निकालात याचे प्रत्यंतर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्रात यंदा काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होऊ नये, असे काँग्रेस कार्यकर्त्यांचे व युवक वर्गाचे मत होते. त्यानुसार आघाडी झाली नाही, ते एकादृष्टीने चांगलेच झाले. आतापर्यंतचा इतिहास पाहिला, तर काँग्रेसमुळेच राष्ट्रवादीला सत्तेचा लाभ झाला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पारदर्शी कारभार केल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात शंभरहून अधिक जागा मिळतील. भाजपकडे राज्यपातळीवरील कोणताच आश्वासक चेहरा नसल्याने पंतप्रधानांना राज्याच्या कानाकोपऱ्यात सभा घ्याव्या लागल्या, हे त्या पक्षाचे अपयश आहे. शिवाय यावरून राज्यात कोठेही मोदी लाट नसल्याचेदेखील समोर आल्याचेही विश्वजित कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)शंभर जागा जिंकणार..माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पारदर्शी कारभार केल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यात शंभरहून अधिक जागा मिळतील, तसेच चाचणी अहवाल फोल ठरेल, असा दावा विश्वजित कदम यांनी केला.साडेसात वाजेपर्यंत मतदानसांगलीतील प्रकार : संजय गांधी झोपडपट्टीचा बहिष्कारसांगली : घरे बांधून मिळावीत, या मागणीसाठी आज (बुधवार) येथील टिंबर एरियामधील संजय गांधी झोपडपट्टीतील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. यामुळे साडेआठ तास मतदान ठप्प झाले होते. राजकीय नेत्यांच्या आवाहनानंतर मतदारांनी बहिष्कार मागे घेतला. यामुळे कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातील मतदान केंद्रावर सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले.घरकुले बांधून मिळावीत, अशी संजय गांधी झोपडपट्टीमधील नागरिकांची गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. राजकीय लोक याकडे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ काल रात्री या परिसरातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. याची माहिती मात्र प्रशासनाकडे नव्हती. या भागातील मतदारांचे मतदान कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक ११६ येथे होते. दिवसभर या मतदान केंद्रावर शुकशुकाट होता. दुपारी तीन वाजेपर्यंत याठिकाणी केवळ १८ टक्के मतदान झाले. झोपडपट्टीवासीयांनी बहिष्कार टाकल्याचे वृत्त समजताच आ. संभाजी पवार त्या ठिकाणी गेले. त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले. घरकुलांबाबत प्रयत्न करण्याचेही आश्वासन दिल्यानंतर मतदारांनी बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला. बहिष्कार मागे घेतल्यानंतर चारच्या सुमारास सर्वच मतदार मतदान केंद्रावर आले. यामुळे सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. सायंकाळी सहानंतर १२५ जणांनी मतदान केल्याची माहिती केंद्राध्यक्ष सचिन पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)प्रशासनाचे दुर्लक्षसंजय गांधी झोपडपट्टीमधील मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. याकडे प्रशासनाने मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. अधिकाऱ्यांनी त्यांना मतदानासाठी आवाहन केले नाही. मतदान केंद्र दिवसभर ओस राहिले होते.निवडणूक वादातून तरुणास मारहाणसांगलीतील घटना : दोघांविरुद्ध गुन्हासांगली : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना ‘शिवसेनेचे काम का करीत नाहीस,’ असा जाब विचारून विकास हणमंत पवार (रा. हरिपूर रस्ता, सांगली) या तरुणास शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी करण्यात आले. शास्त्री चौकात बुधवारी सायंकाळी सव्वापाच वाजता ही घटना घडली. याप्रकरणी दोन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय मारुती गुंडप व शिवाजी संजय गुंडप (दोघे रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. रात्री उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आली नव्हती. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान प्रक्रिया सुरू होती. हरिपूर रस्त्यावरील शास्त्री चौकालगत मतदान केंद्र होते. या केंद्रावर सर्व पक्षाचे समर्थक उभे होते. त्यावेळी विकास पवारही उभा होता. संशयितांनी त्याला बोलावून घेऊन ‘तू शिवसेनेचे काम का करीत नाहीस’, असा त्याला जाब विचारला. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले.संशयितांनी पवारला शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून जखमी केले. त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. रात्री उशिरा त्याने गुंडप यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत हे फौजफाट्यासह शास्त्री चौकात दाखल झाले होते. मारामारीनंतर तिथे गर्दी जमली होती. मात्र सावंत यांना पाहताच ही गर्दी अवघ्या काही क्षणात पांगली गेली. (प्रतिनिधी)राजकीय पक्षावरून वादकेंद्रावर विकास पवारही उभा होता. संशयितांनी त्याला बोलावून घेऊन ‘तू शिवसेनेचे काम का करीत नाहीस’, असा त्याला जाब विचारला. यातून त्यांच्यात जोरदार वाद झाला. त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला.
विश्वजित कदम : जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे साटेलोटे
By admin | Updated: October 16, 2014 00:09 IST