आळसंद : बलवडी (भा) (ता. खानापूर) येथील पाणी चळवळीचे नेते, शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते भाई संपतराव (दादा) पवार यांच्या पत्नी विजयाताई संपतराव पवार (वय ६८) यांचे साेमवारी कर्करोगामुळे निधन झाले.
सहा महिन्यांपूर्वी विजयाताईंची बायपास शस्त्रक्रिया झाली होती. त्यातून त्या पूर्णतः बऱ्या झाल्या होत्या.
पंधरा दिवसांपासून त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना सांगली येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांना कर्करोगाचे निदान झाले. रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी पहाटे सकाळी सहाच्या दरम्यान त्यांचे निधन झाले. विजयाताई या पुरोगामी विचारवंत व्ही.वाय. पाटील यांच्या भगिनी, उगम फाउंडेशनचे कार्यवाह ॲड. संदेश पवार यांच्या आई होत. बळीराजा स्मृतिधरण, क्रांतिस्मृती वनाच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
चिरंजीव ॲड. संदेश पवार यांनी पार्थिवाला मुखाग्नी दिला. विजयाताईंच्या निधनाने पुरोगामी चळवळीचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच प्रवीण पवार, उपसरपंच प्रसाद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील, क्रांती सहकारी साखर कारखान्याचे दिलीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघटनेचे उपाध्यक्ष प्रा. प्रशांत पवार, विटा अर्बनचे संचालक चंद्रकांत पवार, बलवडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शिवाजीराव पवार, माजी सरपंच रघुनाथ पवार उपस्थित होते.
विजयाताईंच्या निधनाचे वृत्त मिळताच बलवडी येथे गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्यामागे पती, मुलगा, पाच मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन बुधवारी सकाळी दहा वाजता बलवडी (भा.) येथे होणार आहे.