मिरजेत वाहतूक पोलिसांकडून लूटमार सुरू असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ही लूट थांबवावी, अशी मागणी कोल्हापूरच्या अजित पाटील या टॅक्सीचालकाने व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. या टॅक्सीचालकाची व्हिडिओ क्लीप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने पोलीस उपअधीक्षकांनी, मिरज वाहतूक नियंत्रण शाखेकडे विचारणा केली आहे. मिरजेत वाहतूक नियंत्रण शाखेकडे सुमारे ४० कर्मचारी असून, यापैकी बहुतांश वाहतूक कर्मचारी शहराच्या एन्ट्री पाॅईंटवर असतात. परजिल्ह्यातून व पराराज्यातून मिरजेत येणाऱ्या वाहनांची अडवणूक करून पोलिसांकडून आर्थिक लूट सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. वाहनांची सर्व कागदपत्रे असतानाही पोलीस आर्थिक दंड करीत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत. मिरजेतील वाहतूक पोलिसांच्या कारभाराबाबत तक्रार करणाऱ्या कोल्हापूर येथील अजित पाटील या टॅक्सीचालकाचा शोध सुरू असून, त्यांच्याकडून तक्रारीबाबत तपशील घेऊन संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले. टॅक्सीचालकाच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील शास्त्री चाैक, महात्मा फुले चाैक, गांधी चाैक, कोल्हापूर रोड या एन्ट्री पाॅईंटवरील वाहतूक पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या असून, येथील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आल्याचेही अनिल माने यांनी सांगितले.
मिरजेत वाहतूक पोलिसांकडून लूटमारीच्या तक्रारीचा व्हिडीओ व्हायरल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:27 IST