लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळाल्यानंतर सांगली शहरात काँग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला.
निकाल जाहीर होताच सकाळी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते मार्केट यार्ड येथील राष्ट्रवादी कार्यालयाजवळ एकत्र आले आणि तिथून त्यांनी मोटारसायकल रॅली काढली. चौका-चौकात थांबून विजयाच्या घोषणा देत त्यांनी एकच जल्लोष केला. गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कार्यकर्ते गुलालात न्हाऊन गेले. मिरवणुकीत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, कमलाकर पाटील, महापालिकेचे विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, नगरसेवक विष्णू माने, दिग्विजय सूर्यवंशी, मंगेश चव्हाण, अमर निंबाळकर, सागर घोडके, राहुल पवार, पद्माकर जगदाळे, शिकंदर जमादार, बिपिन कदम आदी सहभागी झाले होते.