पदवीधर मतदारसंघासाठी यावेळी मोठी चुरस पाहायला मिळाली. नेहमीपेक्षा जास्तीचे मतदान होऊन, मतदारांनी आजवर भाजपकडे असणारा हा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकला. यासाठी सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे या पाचही जिल्ह्यांतून राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्षांनी ताकद लावली होती. त्यामुळे या सर्वांचे लक्ष याकडे लागले होते.
शुक्रवारी मतमोजणी सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी गावात फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण केली. या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांनी परिश्रम घेतले होते. त्यामुळे या निवडणुकीचा केंद्रबिंदू शरद लाड हेच होते. बैलगाडीतून तसेच ट्रॅक्टरमधून संगीताच्या ठेक्यावर ताल धरत तरुण बेधुंद होऊन आनंद व्यक्त करत होते. क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी अरुण लाड यांचे त्यांच्या पत्नी प्रमिलाताई लाड व त्यांच्या स्नुषा धनश्रीताई लाड यांनी औक्षण करून शुभेच्छा दिल्या.
फोटो-०४पलुस१.२.३