लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अनिकेत कोथळे खूनखटल्यातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे याची महत्त्वपूर्ण साक्ष सोमवारी न्यायालयासमोर नोंदवण्यात आली. मंगळवारी बचाव पक्षाने त्याचा उलटतपास घेतला. त्याच्या जबाबातील विसंगती समोर आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सरकार पक्ष आणि बचाव पक्ष यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
अनिकेत कोथळे या तरुणाचा पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह आंबोली घाटात जाळण्यात आला. या खूनखटल्याची प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश विजय पाटील यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी काम पाहिले.
सोमवारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे याची साक्ष घेण्यात आली. ‘मी आणि अनिकेत कोथळे दोघे पळून गेलो होतो. अनिकेत कुठे आहे माहिती नाही, असेच सांगायचे. तसे सांगितले नाही, तर अनिकेतसारखे तुलाही मारून टाकीन,’ अशी धमकी पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याने डोक्याला रिव्हॉल्व्हर लावून दिली होती, अशी साक्ष भंडारे याने न्यायालयात नोंदवली. त्यानंतर सारा घटनाक्रम न्यायालयासमोर सांगितला.
बचाव पक्षातर्फे ॲड. प्रमोद सुतार, ॲड. विकास पाटील-शिरगावकर, किरण शिरगुप्पे, सी. डी. माने, गिरीश तपकिरे यांनी उलटतपास घेतला. त्यात ॲड. पाटील यांनी जबाबातील विसंगतीला लक्ष्य केले. कामटे याच्या भीतीने खोटा जबाब दिल्याचे भंडारे याने सांगितले. त्यानंतर मारहाण झाल्याचे न्यायालयात सांगितले नसल्याचा मुद्दा ॲड. सुतार यांनी मांडला. मात्र, वैद्यकीय तपासणीवेळी तसे सांगितले होते, असे भंडारे याने सांगितले. यावेळी सरकार पक्ष आणि बचाव पक्ष यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.
बुधवारी पुन्हा सुनावणी घेतली जाणार आहे. सहायक सरकारी वकील प्रमोद भोकरे, सीआयडीचे पोलीस उपाधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी सरकार पक्षाला सहकार्य केले.