सांगली : शहरात भाजीपाला विक्रीला अडथळा निर्माण करून विक्रेत्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याच्या निषेधार्थ, मंगळवार १७ ऑगस्टपासून भाजी विक्री पूर्णतः बंद ठेवण्याचा निर्णय जनसेवा भाजीपाला संघटनेने घेतला आहे. १९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे अध्यक्ष शंभोराज काटकर यांनी सांगितले.
काटकर म्हणाले, कोरोनाच्या काळात संघटनेने जिवावर उदार होऊन घरोघरी भाजीपाला पुरविण्याचे काम केले. मात्र, अधिकृत भाजी मंडईच्या नावाखाली ठरावीक रस्त्यांवरच बाजार सुरू करायचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. आठवडा बाजार बंद ठेवून अन्याय केला जात आहे. उपनगरांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून विक्रेत्यांनी भाजीपाला विक्री सुरू केली होती. मात्र, काही नगरसेवक व व्यापाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलीस व महापालिकेने विक्रेत्यांवर कारवाई करीत आहेत. त्यांना अपमानास्पद वागणूक देत आहेत. विक्रेत्यांचा सन्मानाने जगण्याचा अधिकारही हिरावून घेतला जात आहे.
मारुती रोडवरील बेकायदेशीर बाजारावर डोळेझाक केली जात आहे. मिरजेतील लक्ष्मी मार्केट ते दत्त चौक या रस्त्यावरही बाजारातही प्रचंड गर्दी होते. तिथे कसलीच कारवाई होत नाही, पण उपनगरात नियमांचे पालन करून, भाजीपाला विक्री करणाऱ्यांवर नियमांचा बडगा उगारण्यात येत आहे. महापालिका व पोलिस प्रशासनाच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी जनसेवा भाजीपाला संघटनेच्या वतीने १७ ऑगस्टपासून शहरात भाजी विक्री बंद करण्यात येईल. १९ ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचे काटकर यांनी सांगितले.