बुधगाव : वसंतदादा साखर कारखान्याच्या कर्जफेडीसाठी बुधगाव येथील वसंतदादा अभियांत्रिकी महाविद्यालय विक्रीचा मुद्दा समर्थनीय नाही. महाविद्यालय बुधगावकरांच्या जागेत असल्याने सर्वप्रथम त्यावर बुधगावकरांचा अधिकार आहे. हे महाविद्यालय विक्रीची भाषा करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे, अशी प्रतिक्रिया बुधगावकरांच्यावतीने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केली आहे. वसंतदादा कारखान्यावरील कर्जफेडीसाठी बुधगाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय विक्रीचा मुद्दा कारखाना बचाव समितीच्या बैठकीत काहींनी परवा मांडला होता. यामध्ये त्यांनी महाविद्यालयाच्या जागेसह किंमत केल्याचे दिसते. मात्र बुधगावकरांनी महाविद्यालयासाठी ४२ एकर गायरान जमीन विनामोबदला दिलेली आहे, हे लक्षात घ्यावे. महाविद्यालय विक्रीचा मुद्दा भविष्यात पुढे आलाच, तर महाविद्यालयाची जमीन त्यामध्ये ग्राह्य धरू नये. जमीन बुधगावकरांना परत द्यावी लागेल, हे लक्षात घ्यावे. ती शिक्षणाच्या उदात्त हेतूने दिली असून, ती कर्जे फेडण्यासाठी दिलेली नाही. मुळात महाविद्यालय विक्रीची भाषाच असमर्थनीय असल्याचे मत ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. या बैठकीला सरपंच सुजाता पाटील, प्रतापसिंह पाटील, उपसरपंच सुखदेव गोसावी, प्रशांत मोहिते, धैर्यशील देसाई, कुलदीप पाटील, शेखर पाटील, राजेंद्र शिवकाळे, अनिल डुबल उपस्थित होते. (वार्ताहर)
वसंतदादा अभियांत्रिकी विक्री करण्यास विरोध
By admin | Updated: July 29, 2014 22:55 IST