सांगली : येथील वसंतदादा साखर कारखान्याला ऊस पाठविलेल्या सुमारे दोनशे शेतकऱ्यांना पहिला हप्ताही मिळाला नाही. या शेतकऱ्यांची सुमारे ४० ते ५० कोटींची रक्कम कारखान्याकडे थकित आहे. या शेतकऱ्यांनी थकित रक्कम त्वरित देण्याच्या मागणीसाठी कारखान्यासमोर निदर्शने करून प्रशासनाचा निषेध केला. १० जुलैपर्यंत पैसे न मिळाल्यास दि. ११ रोजी कारखान्यासमोरील सांगली-तासगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलनाचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांची थकित रक्कम देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे कारखाना प्रशासनाने सांगितले.वसंतदादा कारखान्याला २०१३-१४ या वर्षाच्या गळीत हंगामासाठी ऊस देणाऱ्या निंबळक, नांद्रे, बुधगाव, कसबे डिग्रज, वसगडे, कुकटोळी, कवठेएकंद, कर्नाळ, कवलापूर, जुनी धामणी, बिसूर, बेडग, बांबवडे, बागणी आदी गावांतील दोनशेहून अधिक शेतकऱ्यांची बिले थकित आहेत. १५ फेबु्रवारी ते एप्रिलअखेरपर्यंत ऊस घातलेल्या शेतकऱ्यांना पहिला हप्ताही मिळाला नााही. या शेतकऱ्यांचे सुमारे ४० ते ५० कोटी रुपये कारखान्याकडे थकले आहेत. शेतकरी गेल्या महिन्यापासून थकित बिलासाठी कारखाना प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांकडे प्रयत्न करीत आहेत. पण, उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहेत. सोमवारी प्रशासनाने शेतकऱ्यांना बिल देण्यासाठी बोलाविले. परंतु, कारखाना कार्यालयात अधिकारीही नाहीत आणि कारखान्याच्या अध्यक्षांचाही पत्ता नव्हता. यामुळे शेतकऱ्यांनी कारखान्यासमोर जोरदार निदर्शने करून जाहीर निषेध केला. १० जुलैपर्यंत कारखान्याकडून बिल न मिळाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संजय सूर्यवंशी, अनिल सरगर, धोंडिराम पाटील, निंबळक येथील भागवत पाटील, शामराव साळुंखे, बाबासाहेब पाटणे, प्रकाश पाटील, पांडुरंग घारगे, सतीश पाटील आदी शेतकऱ्यांनी दिला आहे.ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना थकित बिलाबाबत निवेदन दिले. प्रशासनाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांची उपासमार सुरू असून, त्वरित निर्णय घेण्याची मागणी त्याद्वारे केली आहे. कारखाना प्रशासनाला थकित बिल देण्याबाबत सूचना देऊ, असे आश्वासन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी दिले. त्यानंतर काही प्रमाणात संतप्त शेतकऱ्यांचे समाधान झाले. (प्रतिनिधी)
‘वसंतदादा’कडे चाळीस कोटी थकित
By admin | Updated: July 8, 2014 00:45 IST