मांजर्डे : मान्सून सक्रिय होऊन २० दिवस झाले. पहिल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी पेरणीसाठी सरसावला होता. हजारो रुपयांचे बियाणे व खते खरेदी केली गेली. बऱ्यापैकी पेरणीही झाली. उर्वरित पेरणीपूर्वी पावसाने हुलकावणी दिल्याने तासगाव पूर्व भागात पेरणीचा खोळंबा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पंधरवड्यापूर्वी तासगाव पूर्व भागात पेरणीलायक पाऊस झाल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या उरकण्याची घाई केली. काही शेतकरी आणखी पावसाच्या प्रतीक्षेत हाेते; परंतु आठ दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतातुर झाले आहेत. पेरणी राहिलेल्यांना पावसाची प्रतीक्षा आहे. तासगाव तालुक्यात गेल्या पंधरवड्यात विविध भागांत हलका ते मध्यम काही भागांत जोरदार मान्सूनपूर्व पाऊस झाला. शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीची कामे लगबगीने आटोपून घेतली. बियाणे आणि खते खरेदी करून ठेवली. त्यानंतर आठवड्यात एक ते दोन वेळा हलका ते मध्यम पाऊस झाला. या पावसावरच विविध भागांत शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवातही केली.
मात्र, त्यानंतर पाऊस गायब झाल्याने पेरणी आटोपलेल्या शेतकऱ्यांसह राहिलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, गेल्या आठवड्याचा विचार करता सायंकाळपर्यंत आकाशात ढग गर्दी करतात. सायंकाळी हलकासा गारवा सुटतो. तुरळक ठिकाणी एखादी हलकी सर येऊन जाते आणि ढग पांगून जातात. दिवसभर प्रचंड उन्हाळ्याचा अनुभव येत आहे.
चाैकट
पावसाने दडी मारल्याने हजारो रुपयांचे बियाणे व खते वाया जाणार की काय, अशी भीती व्यक्त हाेत आहे. ज्वारी, मूग, उडीद, सोयाबीन आदींच्या बहुतांश पेरण्या झाल्या आहेत. पाऊस वेळेवर पडला नाही तर यावर्षी दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर येण्याची वेळ आहे.
फोटो : ०६ मांजर्डे १
ओळ : आरवडे (ता. तासगाव) परिसरात सोयाबीनची कोळपणी सुरू आहे.