लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : माजी आमदार विलासराव शिंदे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवारी, दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता आष्टा-सांगली मार्गावरील विलासराव शिंदे यांचे निवासस्थानी अत्याधुनिक डिजिटल लायब्ररीचे भूमिपूजन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्षा मंगलादेवी शिंदे यांनी दिली.
शिंदे म्हणाल्या, विलासराव शिंदे आष्टानगरीचे शिल्पकार होते. जिल्ह्यासह राज्यातील विविध महत्त्वाच्या पदावर त्यांनी काम केले. गोरगरीब, गरजू, दीनदलितांना त्यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला. शहराच्या विकासाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. त्यांचे कार्य भावी पिढीला मार्गदर्शक असे आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपता यावा, यासाठी डिजिटल लायब्ररी व वृद्धाश्रम सुरू करण्यात येणार आहे. त्यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवारी, दि. १७ रोजी सकाळी ११ वाजता विलासराव शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात येईल. यावेळी अत्याधुनिक डिजिटल लायब्ररीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.